भाजप आमदार सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?, जळगाव जिल्हयातील समीकरण बदलण्याची चिन्हे

पोलीसनामा ऑनलाईन : भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले उत्तर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Senior leader Eknath Khadse) हे भाजपाला पहिला झटका देणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. वाढदिवसाच्या पोस्टरमुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात या चर्चेने जोर धरला आहे. भाजपाचे आमदार संजय सावकारे ( BJP MLA Sanjay Saavkare) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात होते. त्याची सुरूवात आमदार संजय सावकारे यांच्या प्रवेशाने होण्याची चिन्हे आहेत. आ. सावकारे यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सावकारे यांच्या समर्थकांकडून भूसावळ शहरात शुभेच्छाचे फलक लावले. मात्र, भाजपा आमदार सावकारे यांच्या शुभेच्छांच्या फलकावरून पक्षाच्या नेत्यांची छायाचित्रे गायब झाल्याचे दिसून आले. सोशल मीडियावरूनही आ. सावकारे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. सोशल मीडियावरील अनेक शुभेच्छा संदेशांवरही भाजपा नेत्यांऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे छायाचित्र होते. शुभेच्छांच्या या फलकावरून भाजपा नेते गायब असल्याने आता सावकारे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

आ. सावकारे खडसे यांचे कट्टर समर्थक
भाजपा आ. सावकारे हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी सावकारेंना राष्ट्रवादीतून भाजपात ओढले होते. मात्र, आता खुद्द एकनाथ खडसे हेच राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. त्यांच्याबरोबर इतर समर्थक नेते आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादी आले आहेत. त्यामुळे आमदार सावकारे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा केली जात आहे.