सत्तारांच्या बंडावर नारायण राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘जहरी’ टीका, म्हणाले…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु खातेवाटप अजून झाले नाही. त्यानंतर भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. सरकार स्थापन करुन महिना झाला तरी खातेवाटप झाले नाही आणि बंगले घेतले परंतु कारभार सुरु झाला नाही. खातेवाटप न होता मंत्र्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. ही तर सुरुवात आहे. घरातच कॅबिनेंट मंत्रीपद घेतलं. मुख्यमंत्रीपद घेतलं आणि सामान्य शिवसैनिकाला सत्तेबाहेर ठेवलं. त्यांना जनतेच्या कोणत्याही प्रश्नाशी देणघेण नाही.

नारायण राणे म्हणाले की, महाविकासआघाडीचं सरकार 2 महिनेही टिकेल याची खात्री नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोणताही अभ्यास नाही, वचक नाही, कोणतंही काम नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं आहे. कर्जमाफीचा जीआर काढला त्यावर कधीपासून अंमलबजावणी करणार याचा उल्लेख नाही.

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला की, तीन पक्षांचे एकत्र येणे चुकीचं आहे. विचारधारा वेगळ्या असताना सत्तेत ते एकत्र आलेत. राज्यातील जनतेसाठी एकत्र आले नाहीत. त्यांचा वाद मलाईदार खात्यांसाठी आहे ही वस्तुस्थिती आहे. हे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकारमध्ये अस्तित्व नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एखादा प्रश्न विचारला तर जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरातांकडे ते बघतात.

या दरम्यान खातेवाटपापूर्वीच शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्या त्यानंतर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्यालही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. ही महाविकासआघाडीसाठी धोक्याची घंटा असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

तर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली की, महिन्याभरापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु अद्याप खाटेवाटप नाही. खातेवाटपापूर्वीच एका मंत्र्यांने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू असे आश्वासन देऊन त्यांना राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही सरकारच्या पतनाची सुरुवात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/