भाजपच्या यादीसाठी ‘रात्रीस चाले बैठक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची वेळ जवळ येत असताना उमेदवारांच्या नावांची निश्चिती करण्यासाठी सर्वच पक्षांच्या बैठका सुरु आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या नेत्यांची बैठक जवळपास ८ तास सुरु होती. मात्र, त्यानंतरही आतापर्यंत भाजपने पहिली यादी जाहीर केलेली नाही.

रविवारी दुपारनंतर पहिली ८० जणांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर जवळपास दोन वाजेपर्यंत पार पडलेल्या या बैठकीत अकरा राज्यांमधील मतदार संघांविषयीचे महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजनाथ सिंह, अरुण जेटली आणि किरेन रिजीजू यांची बैठकीला उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील ८० जागांविषयी बैठक रविवारी अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडण्याची चिन्हे आहेत.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील विदर्भासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम या राज्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यासाठी भाजपाच्या पहिल्या यादीत १७ ते १८ उमेदवारांचा समावेश असल्याची बाब समोर येत आहे. या यादीत २०१४ मध्ये निवडून आलेल्या उमेदवारांपैकी जवळपास पाच ते सहा जणांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे.