…तरीही जनतेचे मतपरिवर्तन होणार नाही, आ. रोहित पवारांचा भाजपला टोला

नाशिक :पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यातून राज्यात चांगली कामे सुरु असूूनही भाजपकडून त्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध केला जात आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी केला. विरोधासाठी सोशल मीडियाकरिता कितीही लोक विकत घेतले, तरीही जनतेचे मतपरिवर्तन होणार नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी विरोधकांना लगावला आहे.

आमदार झाल्यानंतर रोहित पवार पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले होते. यावेळी तरुण कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दिलीप बनकर, सरोज आहिरे, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, नानासाहेब महाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, नंदन भास्करे आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार पवार म्हणाले की, जीएसटीची अंमलबजावणी घाईने सुरू असताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन महिन्यांत राज्याला त्याचा हिस्सा मिळेल असे जाहीर केले होते. पण गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यासाठी विरोधकांनी काम करण्याऐवजी विरोधाची भूमिका घेतली जात आहे, असा आरोप करून त्यांनी भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या काळातील आणि आताच्या महाविकास आघाडीच्या काळातील घेतलेल्या निर्णयाबरोबर मदतीची जंत्री उपस्थितांच्या समोर ठेवली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रश्‍न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याप्रमाणे जिल्ह्यावर लक्ष आहे. आई आजारी असताना कोरोना संसर्गाच्या काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे सामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी धावून गेले आहेत, असे ते म्हणाले.

80 हजार अकाउंटवरून प्रचार
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार पवार यांनी सोशल मीडियातून विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा दाखला दिला. ते म्हणाले, की बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात एका चित्रपट अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याचे राजकारण करण्यासाठी सोशल मीडियातून 10 हजार अकाउंटच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिस योग्य काम कसे करत नाहीत हे सांगण्याचे काम केले.