बाळासाहेब सानप यांचा सेनेला ‘जय महाराष्ट्र’, घरवापसीनंतर भाजपमध्ये फूट, शेकडो कार्यकर्ते नाराज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिकचे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप (balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हणत भाजपमध्ये प्रवेश केला. सानप यांच्या भाजप प्रवेशामुळे सेनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या घरवापसीमुळे नाशिक, धुळे जिल्ह्यातील शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेते खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत भाजपचे शेकडो पदाधिकारी मंगळवारी (दि. 22) दुपारी तीन वाजता शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील शिवसेना भवनात भाजप पदाधिकाऱ्याचा शिवसेना प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सानप यांनी दोनच वर्षात पुन्हा पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सानप यांनी नाशिक पालिकेचे महापौरपद देखील भुषवले आहेत. 2014 च्या मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर सानप यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2019 ची निवडणूक सानप यांनी लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेत पराभव झाल्यामुळे सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता शिवसेनेला रामराम ठोकून सानप पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले आहे.

महाविकास आघाडीतील अनेक आमदार संपर्कातः फडणवीस
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आता महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि आमदार संपर्कात असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असा खळबळजनक दावा केला आहे.