नवाब मलिकांच्या टीकेला भाजपकडून सडेतोड उत्तर; केशव उपाध्ये म्हणाले – ‘माशा मारण्याची स्पर्धा तर दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरू आहे’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली गेली आहे. तर, केंद्र सरकारने ५० टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सरकारकडून केली गेली. याच मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सर्व केंद्राने करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? या प्रश्नावरून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. मात्र, मालिकांच्या या निशाण्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्येंनी पलटवार केला आहे.

केशव उपाध्ये म्हणाले, माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा अथवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत. पुढे उपाध्ये मालिकांना प्रत्युत्तर देत म्हणाले, आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? दहा बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करत आहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र राज्य उघड्या डोळ्यांनी बघतो आहेच, असे उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा, अशी जोरदार टीका मलिक यांनी फडणवीसांवर केलीय. याच टिकेवरून केशव उपाध्ये यांनी मालिकांना प्रत्युत्तर दिले आहे.