भाजपा-सेना युतीचे सरकार भिकारी : अशोक चव्हाण

काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातून झाला. कळंब येथील चिंतामणीचे आशीर्वाद घेऊन ही यात्रा यवतमाळात धडकली. स्थानिक समता मैदानावर आयोजित जाहीर सभेत खासदार अशोक चव्हाण यांनी सरकारच्या धोरणासह भाजप-सेनेमधील नेत्यांच्या कोडग्या प्रवृत्तीचा समाचार घेतला. ते म्हणाले, आजच्या सभेला उसळलेली गर्दी हे सरकारविरोधातील असंतोषाचे प्रतीक आहे. राज्यातील ज्वलंत समस्या सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. राज्याला नेतृत्व देणारा हा जिल्हा असून कै. वसंतराव नाईकांसह सुधाकरराव नाईकांनी हरितक्रांतीसह जलसंधारणात मोठी क्रांती घडवून आणली. विद्यमान सरकारच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, असे म्हणायचा प्रसंग जनतेवर आला असून वही लौटा दो मेरे बिते दिन असे आज जनता म्हणत आहे.
तीर्थक्षेत्र पोहरादेवीत घेण्यात आलेला मेळावा पहिल्यांदा सामाजिक असल्याचे दर्शविण्यात आले. कालांतराने हा मेळावा सेना-भाजपाचा करण्यात आला. शंभर कोटी विकासासाठी देणार, अशी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात कृतीत आणल्यानंतरच खरी ठरेल. काल-परवाच साईबाबा संस्थानकडून ५०० कोेटी रुपये या सरकारने घेतले. यांना देवाचेही पैसे कमी पडतात, असे म्हणत हे मुख्यमंत्री देणारे नव्हे तर पैसे काढून घेणारे असल्याचे चव्हाण म्हणाले.
राज्याच्या एका मंत्र्याने मुख्यमंत्री देवाचा अवतार, अशी स्तुतीसुमने उधळली. ते देवाचे अवतार असते तर राज्यातील दुष्काळ नाहीसा झाला असता. मुळात त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या आडनावातच दानवे आहे. यामुळे ते देवाचे नसून दानवाचे अवतार असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.