मुनगंटीवारांची चौफेर फटकेबाजी, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ वरुन उडवली मुख्यमंत्र्यांची ‘खिल्ली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात जोरदार कलगीतुरा रंगलेला पहायला मिळाला. अर्णब गोस्वीमी (Arnab Goswami) आणि अभिनेत्री कंगणा राणौत (Kangana ranaut) यांच्या हक्कभंग प्रकरणावरुन विधानसभेत महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप (BJP) नेते आमनेसामने आले. विधानसभेत मागील अधिवेशनात शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात आला, आज या समितीचा अहवाल सादर करण्यासाठी सभागृहात मुदतवाढ देण्यात आली.

विशेष हक्कभंग प्रस्तावावरुन भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या खडाजंगी झाली, वैयक्तिक टीका-टिप्पणी केल्यास हक्कभंग कसा होऊ शकतो असा सवाल भाजपने केला, तर आमदारांना विशेषाधिकार दिले कशाला ? तुम्ही कधी हक्कभंग वापरले नाही का ? मागील पाच वर्षात किती हक्कभंग मांडले हे दाखवू का ? सभागृह असताना कोर्टात जायचं कशाला ? असा सवाल अनिल परब यांनी केला.

तर मागील विधानसभेत पंकजा मुंडे यांनी एका लक्षवेधीला उत्तर दिलं त्यात जे विधान नव्हतं त्याबद्दल बातमी दिली होती, ते विधानसभेसंदर्भात होतं, प्रत्येक आमदाराला विशेष अधिकार दिला आहे. मात्र विधानसभेतील खोटी माहिती बाहेर दिली जाऊ शकत नाही, तसं झालं असेल तर हक्कभंग असू शकतो, जर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मुख्यमंत्र्यांबद्दल काही विधान केले असेल तर तो राज्याचा अवमान आहे तर हा नियम विरोधी पक्षनेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीतही लागू होतो आणि असा नियम झाला तर सभागृहात 10 हजार हक्कभंग दाखल होऊ शकतात, असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

दरम्यान, माझे कुटुंब माझी जबाबदारी यावरुन देखील सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला. माझे कुटुंब, माजी जबाबदारी, माझे पेपर आणि माझी मुलाखत, माझे पोलीस आणि माझा एफआयआर अशा शब्दात मुनगंटीवर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. पुरवणी मागण्यावेळी सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत होते.