Aurangabad News : भाजप कार्यकर्त्यांचा राडा, बॅरिकेट्स तोडले !

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद शहरात मोहोटा देवी मंदिराजवळ भाजी मंडईच्या स्थलांतरणाच्या विरोधात सुरू असलेल्या विक्रेत्यांच्या आंदोलनात भाजपनं समर्थन देत रात्रभर ठिय्या आंदोलन केलं. इतकंच नाही तर पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्सही त्यांनी तोडले आणि रस्त्यावर टायर जाळून जोरदार घोषणाबाजी केली होती. भाजप पदाधिकाऱ्यासह 50 ते 60 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बजाजनगरात असलेल्या भूखंडावर सुमारे 25 वर्षांपासून भाजी मंडई भरत आहे. परंतु प्रशासनानं ही मंडई इतरत्र हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या स्थलांतरणाला विक्रेत्यांचा विरोध आहे. विक्रेत्यांनी यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलक विक्रेत्यांशी चर्चा केली होती.

सत्तार चर्चा करून परत गेल्यानंतर काही भाजप पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला. यासाठी त्यांनी ठिय्या दिला होता. यानंतर भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांनी रात्री विक्रेत्यांशी संवाद साधला आणि ते या विक्रेत्यांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. या परिसरात पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. परंतु संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी हे बॅरिकेट्स तोडले आणि जाळपोळ केली.

या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंडई परिसरात आज सकाळपासूनच तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी देखील या प्रकरणात लक्ष घालून होते.

विक्रेत्यांनी जागा खाली करण्यासाठी प्रशासनानं त्यांना सूचना केल्या होत्या. परंतु तरीही आज सकाळपर्यंत विक्रेत तिथंच ठिय्या देत बसले होते. यामुळं सकाळी एमआयडीसी पोलिसांनी विक्रेते आंदोलक आणि भाजप पदाधिकारी संजय केनेकर यांच्यासह 50 ते 60 जणांना ताब्यात घेतलं. यांनतर आता परिसरात काहीसा तणाव निर्माण झाल्याचं दिसत आहे.