अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपचे कमळ हाती घेणार

पश्चिम बंगाल : पोलीसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती भाजपच्या वाटेवर असून ते येत्या 7 मार्च रोजी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी 16 फेब्रुवारी रोजी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर चक्रवर्ती भाजपात येणार की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेली ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात होती. अखेर ती भेट यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी नागपूरमध्ये मिथून यांनी भागवत यांची भेट घेतली होती, त्यावेळी भागवतांना त्यांनी घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेत खासदार राहिले आहेत. मात्र ते राजकारणात फार रमले नाहीत. टीएमसी खासदार म्हणून शपथ घेतल्याच्या काही दिवसांतच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यात आता चक्रवर्ती त्यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजपला किती फायदा होतो, हे पाहण औत्सुक्याचे ठरेल.