रुग्णालयाला चक्रीवादळाचा फटका बसला असल्याची माहिती खोटी, मुंबई महानगरपालिकेचा खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत असल्याचे लक्षात येताच राज्य सरकारने रुग्णांवर उपचार करण्यासाठी युद्धपातळीवर रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर एक खाटांची क्षमता असलेले जम्बो रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाला चक्रीवादळाचा फटका बसला असल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली. यावर मुंबई महापालिकेने खुलासा केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत एक हजार बेडची सुविधा असलेले जम्बो कोविड रुग्णालय वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावर उभारण्यात आले आहे. या रुग्णालयात काही रुग्णही दाखल झाले होते. मात्र, बुधवारी मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने तेथील रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आले होेते. दरम्यान, बुधवारी निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात प्रचंड विध्वंस केला. सुदैवाने मुंबईत हे वादळ आले नाही.

मात्र, या वादळामुळे बीकेसीतील रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात आली. याविषयी मुंबई महापालिकेने ट्विटर हॅण्डलवर रुग्णालयाचे फोटो शेअर करुन खुलासा केला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला मोठा फटका बसल्याच्या अफवा पसरवल्या जात आहे. वादळामुळे रुग्णालयाच्या कुंपणाचे फक्त थोडे नुकसान झाले आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते, असे बीएमसीने म्हटले आहे.

भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर बीकेसीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे व्हिडीओ शेअर केले होते. त्याचबरोबर रुग्णालयाचा मोठे नुकसान झाले असून करदात्यांच्या पैशाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी राज्य सरकार व शिवसेनेवर केला होता.