गिरगाव चौपाटीजवळ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बोड बोट बुडाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील गिरगाव चौपाटीजवळ समुद्रात बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. गस्त घालत असणाऱ्या पोलीसांना घेऊन जाणारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या बोटीत एकूण 6 पोलीस होते. सुदैवाने हे 6 पोलीस बचावले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक पोलीस कर्मचारी मात्र या घटनेत जखमी झाल्याचे समोर आले आहे. सदर पोलीस कर्मचाऱ्याला मुंबई सेंट्रल येथील रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे समजत आहे. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
सदर 6 पोलीसांकडे  लाइफ जॅकेट नव्हते असे समजत आहे. जीवरक्षक प्रतीक वाघे याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सहा पोलिसांचे प्राण वाचले आहेत.  गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर सदर बोट बुडाल्याची घटना घडली आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षीच गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर गिरगाव चौपाटीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. यासाठी गस्तीनौकेचेही आयोजन करण्यात आले होते.  पोलिसांचे एक पथक गस्तीनौकेपर्यंत नेण्यासाठी एका बोटीची व्यवस्था करण्यात आली होती. समुद्रात हीच बोट बुडाल्याची घटना रात्री साडे आठच्या सुमारास घडली. हा प्रकार  जीवरक्षक प्रतीक वाघे याच्या लक्षात आला. त्याने प्रसंगावधान राखत बोटीच्या दिशेने धाव घेतली.
याच दरम्यान पोलिसांची दुसरी गस्तीनौका कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांनी  प्रतीक वाघेच्या मदतीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. या 6 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. हे पाहून एक मच्छीमार  पोलिसांच्या मदतीसाठी र्माकोलच्या साहाय्याने तिथे पोहोचला होता. घटनास्थळी पोचेपर्यंत त्याचीही दमछाक झाली होती. परंतु  प्रतीक वाघेने त्या मच्छीमाराला देखील सुखरुप किनाऱ्यावर आणण्याचे काम केले.