कुणाल कामराच्या ‘सपोर्ट’साठी सरसावला अनुराग कश्यप, म्हणाला – ‘4 वाजता उठेन परंतु IndiGo नं प्रवास करणार नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिग्दर्शक अनुराग कश्यपनं कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनार्थ इंडिगो एअरलाईन्सचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुराग कश्यपला कोलकात्यामधील एका इव्हेंटसाठी जायचं होतं. परंतु इंडिगोची फ्लाईट सोडून अनुरागला 4 वाजता उठून दुसरी फ्लाईट पकडावी लागली. 7 तास आधीच तो इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचला होता. अनुरागनं अशी घोषणाही केली की, जोपर्यंत कुणाल कामराला उड्डाणासाठी परवानगी दिली जात नाही तोपर्यंत इंडिगोच्या फ्लाईटनं प्रवास करणार नाही.

एका मुलाखीत बोलताना अनुराग म्हणाला, “जोपर्यंत कुणाल कामराला परवानगी दिली जात नाही मी 4 वाजता उठेल परंतु इंडिगोची फ्लाईट घेणार नाही.” अनुराग कोलकात्यात एका फिल्म फेस्टीव्हलच्या उद्घाटनासाठी गेला होता. इथेच मुलाखतीत अनुराग म्हणाला, “आर्गनायजर्सनं माझं तिकीट इंडिगोवरून बुक केलं होतं. परंतु इंडिगोनं कुणाल कामराला बॅन केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की, मी या एअरलाईन्सनं प्रवास करणार नाही. मला असं वाटत आहे की, हे बॅन विनाकारण आहे.”

आपल्या निर्णयावर बोलताना अनुराग म्हणतो, “मला असं वाटतं की, या मॅटरमध्ये मी जास्त काही करू शकत नाही. यामुळे जास्त काही फरक पडणार नाही. परंतु मी माझा विरोध नोंदवत राहणार. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे. मी विस्तारा एअरलाईन्सनं येण्याचा निर्णय घेतला. मला असं सांगण्यात आलं होतं की, विस्ताराच्या फ्लाईटसाठी मला 4 वाजता उठावं लागेल. मी म्हणालो, मी 4 वाजता उठेन परंतु इंडिगोनं प्रवास करणार नाही.”