होळीच्या दिवशी रंगलं ‘Baaghi 3’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन, 5 दिवशी कमावले ‘एवढे’ कोटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अहमद खान दिग्दर्शित आणि बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर स्टारर बागी 3 हा सिनेमा शुक्रवार दि 6 मार्च 2020 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अ‍ॅक्शनने भरपूर या सिनेमात टायगर आणि श्रद्धा यांच्याव्यतिरीक्त रितेश देशमुख आणि अंकिता लोखंडे हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. देशभर कोरोनाची दहशत पसरत असतानाही याचा सिनेमाच्या कमाईवर परिणाम झाला नाही. रिलीजच्या पहिल्याच दिवशी 14 कोटींची कमाई करत सिनेमानं पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाईचं रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. सिनेमा रिलीज होऊन 5 दिवस झाले असूनही सिनेमाची जोरदार कमाई सुरू आहे.

होळी आणि कोरोना व्हायरसचा परिणाम बागी 3 च्या कमाईवर होईल असं वाटलं होतं पंरतु होळीच्या दिवशीही सिनेमानं बंपर कमाई केली. इतकेच नाही तर सिनेमानं रिलीजच्या पाचव्या दिवशीही 14.05 कोटींची जोरदार कमाई केली आहे. सिनेमाची एकूण कमाई 76.94 कोटी झाली आहे.

बागी 3 नं पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 17.50 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 16.03 कोटींची कमाई केली तर रविवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी 20.30 कोटी कमावले आहेत. अशा प्रकारे बागी 3 सिनेमाची 3 दिवसांची एकूण कमाई 53.83 कोटी झाली होती. यानंतर सिनेमानं चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी 9.06 कोटी कमावले आणि पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सिनेमानं 14.05 कोटी कमावले आहेत. अशा प्रकारे सिनेमाची एकूण 5 दिवसांची कमाई 76.94 कोटी झाली आहे. जर सिनेमाची अशीच कमाई सुरू राहिली तर लवकच हा सिनेमा 100 कोटींच्या क्लब मध्ये समाविष्ट होऊ शकतो.