हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड म्हणणे अवमानकारक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हॉलिवुड वरुन हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड संबोधणे सुरु झाले, ते प्रामुख्याने इंग्रजाळलेल्या मुंबईतील काही महानुभवांमुळे बॉम्बेचे मुंबईहून अनेक वर्षे झाली तरी ते अजूनही बोलताना बॉम्बे असा जाणीवपूर्वक उल्लेख करतात. अशांना भाजपचे सरचिटणीस कैलाश विजय वर्गीय यांनी चपराक लगावली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलिवूड’ असं संबोधणे अवमानकारक आहे, त्याऐवजी नवीन पर्यायी शब्द तयार करावा, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांच्याकडे विजयवर्गीय ही मागणी करणार आहेत.

त्यांनी सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी मी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना भेटलो होतो. बॉलिवूड हा शब्द परदेशी मीडियाने भारतीय चित्रपटसृष्टीला हिणवण्यासाठी वापरला, असे बोलता बोलता घई म्हणाले. त्यामुळे आपण हा शब्द वापरण्यास परावृत्त करायला हवे. आपण हॉलिवूडची भ्रष्ट कॉपी आहोत, असे वाटते. खरे तर आपल्याकडे दादासाहेब फाळके, सत्यजीत रे यांच्यासारखे दिग्गज होऊन गेले. त्यामुळे बॉलिवूड म्हणून हिणवलं जाणे स्वाभिमानाला धक्का पोहचवणारे आहे.’ असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.

‘बॉलिवूड.. त्याचप्रमाणे कॉलिवूड, मॉलिवूड अशी त्याची प्रादेशिक नावं वापरणं बंद व्हावं. याऐवजी त्या-त्या भाषेच्या नावाचा वापर व्हावा,  यासाठी राठोड यांनी पावलं उचलावीत, अशी मागणी करणारं पत्र मी लिहिणार आहे.’ असंही विजयवगीर्यांनी सांगितले़

कैलाश विजयवर्गीय यांचे संगीत-चित्रपट प्रेम सर्वश्रुत आहे. मध्य प्रदेशात इंदोरमध्ये आयोजित होळी उत्सवात त्यांनी हॉलिवूडचे सुपरस्टार एल्विस प्रेस्ली यांची वेशभूषा केली होती.