कंगनाचं राज्याच्या गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर, म्हणाली – ‘ड्रग्जशी संबंध आढळला, तर कायमची सोडेल मुंबई’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मादक पदार्थांशी कथित संबंधाबाबत मुंबई पोलिस चौकशी करण्याच्या चर्चेदरम्यान कंगना रनौतने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली की, ती प्रत्येक चौकशीसाठी तयार आहे. तिचा कोणताही संबंध आढळला, तर कायमची मुंबई सोडून जाईल.

मंगळवारी महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अभिनेता अध्ययन सुमनने दिलेल्या मुलाखतीचा हवाला देत कंगनाच्या विरोधात ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. एका वृत्तसंस्थेनुसार, अनिल देशमुख म्हणाले- “आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना मी विधानसभेत उत्तर दिले की, कंगना अध्ययन सुमनसोबत नात्यात होती, त्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, ती (कंगना) ड्रग्ज घेत असे आणि त्याच्यावरही असे करण्यासाठी दबाव आणत असे. मुंबई पोलिस त्याच्या तपशिलाची चौकशी करतील.”

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या या वक्तव्याला कंगनाने चोख प्रत्युत्तर दिले. कंगनाने ट्विटरवर लिहिले- “मी मुंबई पोलिस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ही कृपा करून खूप आनंदी होईल. कृपया माझी ड्रग चाचणी करा. माझे कॉल रेकॉर्ड तपासा. जर एखाद्या ड्रग पॅडलरशी संबंध आढळला, तर मी माझी चूक स्वीकारेल आणि कायमस्वरुपी मुंबई सोडेल. तुम्हाला भेटायला उत्सुक आहे.”

कंगना सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात कंगना सातत्याने बोलत आहे. याबाबत ती सुरुवातीपासून बॉलिवूडमध्ये नेपोटीज्म आणि पक्षपातीपणाचा मुद्दा उपस्थित करत आहे. अशावेळी ड्रग्ज अँगल समोर आल्यावर कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून आपले अनुभव सांगितले होते.

तसेच बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनाही त्यांची रक्त चाचणी करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून संशय राहणार नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबतही शाब्दिक युद्धामुळे कंगना सोशल मीडियावर चर्चेत आहे. या दरम्यान बीएमसीने कंगनाला तिच्या मुंबई कार्यालयात बेकायदा बांधकाम केल्याबद्दल नोटीस बजावली आहे.