बाळासाहेब ठाकरे होते म्हणून बॉलिवूड सुरक्षित होतं : उर्मिला मातोंडकर

पोलीसनामा ऑनलाईन – आज मी शिवसेनेची आहे म्हणून येथे आले असले तरी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनही आमच्यासोबतच आहेत, असे शिवसेना नेत्या आणि प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ( urmila matondkar) म्हणाल्या. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला उर्मिला मातोंडकर ( urmila matondkar) यांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही मातोंडकर यांनी वंदन केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

यावेळी मातोंडकर म्हणाल्या की, सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. त्यांनी कमीत कमी बोलल तरी ते लोकापर्यंत पोहचते. कोविड काळात ज्यापद्धतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संयम दाखवला तो कौतुकास्पद होता. आपला धर्म म्हणजे फक्त मंदिर नाही आणि सत्ता हे म्हणजे शेवटचं गणित नाही. माणसाचे आयुष्य महत्वाचे आह हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे निर्णय घेतले ते मला महत्वाचे वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.