Pimpri News : बिलाच्या वादातून एकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली, हॉटेल मालकासह चौघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन –  हाॅटेलमध्ये बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हाॅटेल मालक व तीन कामगारांनी मिळून एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याला जखमी केले. काळेवाडी येथील अनमोल बिअर बार रेस्टाॅरंट येथे शुक्रवारी (दि. २९) हा प्रकार घडला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

हॉटेलमालक मोनिश गोविंद शेट्टी (वय 45, रा. पाषाण सुस रोड, पुणे),मिथुन विष्णू बिसवास (वय 28) विश्वनाथ मखन घोडाई (वय 32) , शांताराम सर्वत्तम शेट्टी (वय 61, तिघे रा. काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. या प्रकरणी सुदर्शन बबन लोखंडे (वय 38, रा. काळेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. लोखंडे यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे हे त्यांच्या मित्रांसोबत हाॅटेलमध्ये दारु पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी बिल भरण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यावेळी हाॅटेलमालक शेट्टी व तीन कामगारांनी फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बिअरची बाटली डोक्यात फोडून जखमी केले. त्यानंतर एक कामगार हातात चाकू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला.