खळबळजनक ! प्रेयसीच्या घरासमोर प्रियकराचा आगीत होरपळून मृत्यू, तरुणाच्या कुटुंबियांचा विवाहित महिलेवर केला ‘हा’ आरोप

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   विवाहित प्रेयसीच्या घरासमोर 27 वर्षी अविवाहित प्रियकराचा आगीत जळून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. शुक्रवारी (दि. 16) रात्री ही धक्कादायक घटना घडली. दरम्यान मृत मुलाच्या कुटुंबाने प्रेयसीवर आणि तिच्या कुटुंबियांवर मुलाला जाळून मारल्याचा आरोप केला आहे. तर प्रेयसीचे वडिल म्हणाले की, तो आमच्या घरासमोर येऊन शिव्या देत होता. काही वेळाने त्याने स्वत:ला पेटवून घेतले होते. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

दीपक निषाद (वय 27) असे आगीत संशयास्पदरित्या जळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दीपक हा विशुनपुरवा गावात आपल्या आई- वडिल आणि भावंडासोबत राहत होता. तो पेंट पॉलिशचे काम करत होता. तसेच तो अविवाहीत होता. दीपकचे एका विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबध होते. शुक्रवारी रात्री लोकांनी त्याला महिलेच्या घराबाहेर जळताना पाहिले होते. त्यानंतर लोकांनीच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तसेच त्याच्या जबाबाचा व्हिडीओही बनवला होता. यात तो एका महिलेचे नाव घेत असून आग लावल्याचा आरोप करत आहे. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान दीपक ज्या महिलेवर प्रेम करत होता ती विवाहित असून तिचा पती एका हत्या प्रकरणात तुरुंगात आहे.

पोलीस अधिकारी अनिल उपाध्याय म्हणाले की, शुक्रवारी (दि. 16) रात्री आठच्या सुमारास एक तरूण महिलेच्या घरासमोर जळाला होता. त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरूण जास्त मद्यसेवन करत होता. यापूर्वीही त्याने दोन-तिनदा स्वत:ला जाळण्याचा प्रयत्न केला होता. प्राथमिक पाहणीतून त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचे दिसत आहे. तरूणाच्या कुटुंबियांकडून लावण्यात आलेल्या आरोपांनुसार तपास केला जात आहे.