राम गणेश गडकरींच्या ‘त्या’ तोडलेल्या स्मारकाची पूजा करून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तीन वर्षांपूर्वी संभाजी उद्यानातून संभाजी ब्रिगेडने  राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवला होता. गडकरी यांचा पुतळा हटवल्यानंतर  महापालिकेने अजूनही  पुतळा इतरत्र बसवला नाही. त्यामुळे आज गडकरी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने संभाजी उद्यानात ब्राह्मण महासंघाच्या वतीने पुतळा हटविलेल्या जागी हार घालून महापालिकेचा निषेध करण्यात आला.

तीन वर्षांपूर्वी संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडने तोडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसाच्या आत पुतळा बसवून देतो असे आश्वासन दिले. परंतु गेली तीन वर्षे झाली हा पुतळा बसवण्यात आला नाही. ३ वर्षे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून वारंवार पुतळा बसवण्यासंदर्भात महापालिकेकडे पाठपुरावा केला जातोय, मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यासाठी महापालिकेकडून पुतळा अद्याप बसवण्यात आलेला नाही. संभाजी बागेत गडकरींचा पुतळा बसवण्याला संभाजी ब्रिगेडचा कडाडून विरोध आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी बागेत किंवा इतर कोणत्याही जागेत गडकरींचा पुतळा बसवण्यात यावा. महापालिकेला याची आठवण करुन द्यावी यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने पुतळ्याच्या जागी हार घालून निषेध केला.

याबाबत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे म्हणाले की , “आता स्मारकाची अवस्था बघितली तरी अजून काम चालू आहे. महानगरपालिका फक्त आश्वासन देते. हे स्मारक होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. दर दोन महिन्यांनी आम्ही दादोजी कोंडदेव, गडकरी यांच्या पुतळ्याची आठवण करून देत होतो. महानगरपालिकेकडून असे सांगण्यात आले की सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये याची आम्ही काळजी घेत आहोत. पालिका स्वखर्चाने पुतळा उभारेल असे आम्हाला सांगण्यात आले. महानगरपालिकेने पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला नाही. महासंघ आक्रमक भूमिका घेऊन स्वखर्चाने पुतळा उभारणार आहे.”

पुणे शहरातील कुठल्याही परिसरात हा पुतळा बसवून दयावा अशी मागणी महासंघाने केली. यावेळी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रवक्ते आनंद दवे, पुणे जिल्हा अध्यक्ष विजय शेखदार, पुणे शहर अध्यक्ष मयुरेश आरगडे, चिन्मय पाठक, तेजस पाठक, सोमनाथ कुलकर्णी आदी उपस्थित होते.