2 लाखाचे लाच प्रकरण : उपअधीक्षक झाल्या गृहिणी तर कर्मचारी शेतमजूर ! उपविभागीय पोलीस अधिकार्‍याला जाळयात पकडण्यासाठी केले होते वेशांतर

जालना : उपविभागीय पोलीस अधीक्षकाला लाच प्रकरणात पकडण्यासाठी गुप्तता पाळणे महत्वाचे होते. त्याचबरोबर पोलीस ठाणे किंवा कार्यालयात संशय आला असता, म्हणून तक्रारदाराच्याच घरी पैसे घेण्यासाठी बोलविण्याचे ठरले. तेथेही संशय येऊ नये, म्हणून पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक या चक्क गृहिणी बनल्या. तर कर्मचारी शेतमजूर बनून घराभोवती लक्ष ठेवून राहिले. ठरल्याप्रमाणे सुधीर खिराडकर याचा पंटर संतोष अंभोरे हा २ लाख रुपये घेण्यासाठी तक्रारदाराच्या घरी आला. त्याला २ लाख रुपये देण्यात आले. त्यात पाचशे रुपयांच्या नोटांमधून एक लाख तर दोन हजारांच्या नोटामधून १ लाख असे दोन लाख रुपये देण्यात आले. त्याला पकडण्यात आल्यानंतर त्याने पंचासमक्ष आपण कोणासाठी हे पैसे स्वीकारले, हे त्याने उघड केले. त्याबरोबर दुसरी टीम तयारच होती. त्यांनी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिराडकर व पोलीस काँस्टेबल विठ्ठल खार्डे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे संपूर्ण दिवसभर आणि शुक्रवारी सकाळी चौकशी केल्यानंतर आज दुपारी त्यांना अटक करण्यात आली आहे.

जालना तालुक्यातील कडवंची शिवारात ४ मे रोजी झालेल्या वादातून जालना तालुका पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. अ‍ॅट्रोसिटी गुन्ह्याचा असल्याचे त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षकांकडे येतो. त्यानुसार तो सुधीर खिराडकर याच्याकडे आला होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी खिराडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती, पंरतु ही लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीचे पथक गेले दोन दिवस जालन्यात तळ ठोकून होते. पण त्यांनी याची कोणाला कल्पना लागू दिली नाही.

पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी घरातील महिलेचा वेश धारण केला होता. अन्य कर्मचारी धोतर व गमछा घेऊन शेत मजूर म्हणून तैनात होते. याप्रकरणाची दोनदा पडताळणी केल्यानंतर त्यात तडजोड म्हणून त्यांनी ३ लाख रुपये स्वीकारण्यास कबुली दिली होती. त्यातील २ लाख रुपये घेण्यासाठी पोलीस तक्रारदाराच्या घरी आला आणि अलगद एसीबीच्या जाळयात अडकला.
इतक्या लांब जाऊन लाच प्रकरणात सापळा रचून उपविभागीय पोलीस अधिकार्‍याला पकडण्याची ही राज्यातील पहिलीच केस असावी.