दोन सराईत गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंडगार्डन व सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन सराईत गुंडांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत.

शुभम महेंद्र भोसले (२३, ताडीवाला रोड) असे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईताचे नाव आहे.

शुभम भोसले हा परिसरातील सराईत गुंड असून त्याच्यावर खून, दरोडा, जखमी करणे, हाताने मारहाण करून शिवीगाळ करणे, दंगा करणे, समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जमावात सामील होणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे त्याच्यावर बंडगार्डन व फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

तर आशिष उर्फ धोंडीबा भोंडवे (२८, धनकवडी) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे.

आशिष भोंडवे हा सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंड आहे. त्याच्यावर दुखापत करणे, वाहनचोरी, घातक शस्त्रे बाळगणे, शिवीगाळ करून मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.