बहिणीची लग्नपत्रिका देण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

मेहुणबारे (चाळीसगाव) : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून घराकडे निघालेल्या भावाच्या दुचाकीला भरधाव वेगातील कारची धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी होऊन भावाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर काका जखमी झाले आहेत. ही घटना चाळीसगाव-धुळे महामार्गावर चिंचगव्हाण फाट्यापासून काही अंतरावर शनिवारी (दि.९) सायंकाळी सहाच्या सुमरास घडली. या घटनेमुळे घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

खाजोळा येथील मुकंदा दगा पाटील यांची मुलगी करूणाचा विवाह २६ फेब्रुवारीला होणार आहे. या विवाह सोहळ्याची घरात जोरदार तयारी सुरू आहे. मुंकदा पाटील यांच्या भावाचा मुलगा प्रविण हेमराज पाटील वय (वय- ३५) त्यांचा भाऊ गुलाब दगा पाटील, (वय-६५) दुचाकीने (MH. 19 CH 4276) लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेले होते. शुक्रवारी दोघांनी दहीवद येथे मुक्काम केला. शनिवारी सकाळी पत्रिका वाटण्यासाठी ते निघाले. सायंकाळी धुळ्याकडून चाळीसगावकडे जाताना चिंचगव्हाण फाट्यापासून एक किलोमीटरवर चाळीसगावकडून धुळ्याकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (MH18 W 2128) समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना प्रविण पाटीलच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेत प्रविण पाटील हा जागीच ठार झाला तर त्याच्या काकाचा एक पाय दुखावला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नजिम शेख, पोलिस हवालदार पांडुरंग पाटील, गफ्फूर शेख यांनी पंचनामा केला. अपघात घडताच कारमधून दोघेही फरार झाले. गुलाब पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कारमधील दोघांनी मद्यपान केले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रविणच्या अपघाताची बातमी समजताच खाजोळा गावात कळताच त्याच्या घरी एकच आक्रोश सुरू झाला. प्रविण हा नवरी मुलीचा चुलत भाऊ होता. प्रविणला एक दहा वर्षांचा मुलगा असून तो हाताने अपंग आहे. यामुळे या घरावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून गावातून हळहळ व्यक्त होत आहे.