Budget 2021 : ‘एअर इंडिया’ची विक्री करण्यावर शिक्कामोर्तब, ‘महाराजा’चं करणार खासगीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारताची सरकारी हवाई वाहतूक सेवा ‘एअर इंडिया’चं पूर्णपणे खासगीकरण करणार असल्याची घोषणा केली आहे. सरकार आता एअर इंडिया कंपनी विकणार आहे.

एअर इंडियावर जवळपास 60 हजार कोटींचं कर्ज असल्याने सरकारकडून कंपनीच्या विक्रीचा निर्णय होण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. अखेर यावर आज शिक्कामोर्तब झालं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहे. सीतारामण यांचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील तरतूदींची घोषणा केली. मात्र, या सगळ्यात एअर इंडियाच्या विक्रीची घोषणेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या घोषणेनंतर विरोधकांनी सभागृहात सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

जेआरडी टाटांनी केली होती एअर इंडियाची स्थापना

सन 1932 मध्ये जेआरडी टाटा यांनी या विमान कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर 1946 मध्ये राष्ट्रीयीकरण होऊन तिचे नाव एअर इंडिया झाले. सुरुवातीला तिचे नाव टाटा एअरलाइन्स होते. राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर तिचे नाव एअर इंडिया ठेवण्यात आले. सध्याच्या घडीला ही कंपनी कर्जबाजारी असून या कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.