नाद खुळा! कोल्हापुरात रंगला म्हशींचा फॅशन शो

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत म्हशींच्या फॅशन शोचे मोठ्या धुमधडाक्यात आयोजन कोल्हापुरात करण्यात आले होते. सुगीची कामे आटोपल्यानंतर बळीराजाला विरंगुळा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे येथील जाणकार सांगतात. सौंदर्य स्पर्धेसाठी ज्याप्रमाणे तरूणी तयारी करतात अगदी तशीच तयारी म्हशींना तयार करण्यासाठी केली जाते.

सर्वप्रथम शेतकरी आपल्या म्हशीला गरम पाण्याने अंघोळ घालतात. त्यानंतर त्यांना सजवून या स्पर्धेत भाग घेतात. अनेक शेतकऱ्यांच्या सजलेल्या म्हशी या स्पर्धेत सहभागी होतात. म्हशींच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारची कलाकुसर काढण्यात येते, तर काहीजण वेगवेगळ्या रंगांची चित्रे काढतात. डोक्यावरील शिंगे आकर्षक रंगांनी रंगवली जातात. तसेच नक्षीदार वस्त्र, गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. म्हशींना आवाज दिल्यावर त्या किती प्रतिसाद देतात, याची प्रचितीच या वेळी येते.

सुंदरी, राधा, हौसा यासारख्या नावाने परिचित म्हशी सजून आपल्या मालकाबरोबर स्पर्धेत सहभागी होतात. ही आगळी-वेगळी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होते. शेतीच्या उत्पन्नाबरोबर दुग्ध व्यवसायावर शेतकऱ्यांची आर्थिक मदार असते. यामुळे या दिवसांमध्ये जनावरांची खास बडदास्त ठेवून त्यांचे औक्षणदेखील करण्यात येते.