परमबीर सिंग, प्रदीप शर्मांच्या अडचणीत वाढ? दुबईत असतानाही अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवल्याची व्यापाऱ्याची तक्रार

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. या दोघांविरोधात भोपाळमधील एका व्यपाऱ्याने दुबईत असतानाही अपहरणाच्या गुन्ह्यात अडकवल्याची तक्रार राज्य सीआयडीकडे नोंदवली आहे. मुनिर खान असे या व्यापाऱ्याचे नाव आहे.

ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने २०१८ मध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी केल्या प्रकरणी बुकी सोनू जालान आणि इतरांवर कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यात मुनिर खान यांनाही आरोपी करण्यात आलं होतं. खंडणी विरोधी पथकाने काही महिन्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल केला व नंतर मोक्का कायद्यात हा गुन्हा बदलण्यात आला. सोनू जालान या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर अपहरणातील सर्वच आरोपींवर मोक्का लावण्यात आला होता. हा गुन्हा परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून नोंदवण्यात आल्याचा दावा मुनीर खान यांनी केला आहे.

अपहरणाच्या वेळी दुबईत असल्याचा दावा
तक्रारदाराचे २२ जानेवारी २०१८ ला अपहरण झाल्याचं म्हणणं होतं. मात्र मुनीर खान ९ जानेवारी २०१८ ते २९ जानेवारी २०१८ या कालावधीत दुबई येथे होते. त्यांना अटक होणार असल्याचे समजले त्यावेळी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी न्यायालयाने दुबईत असलेली व्यक्ती भारतात अपहरण कस करु शकते, असा प्रश्न उपस्थित करत खान यांना अटकेपासून संरक्षण दिल होत.

मुनिर खान यांचा परमबीर सिंगांविरोधात जबाब
काही दिवसांपूर्वी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे सोनू जालान याने तक्रार केली होती. त्यानंतर पांडे यांनी राज्य सीआयडी विभागाला परमबीर सिंग यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या चौकशी सुरु आहे. बुधवारी मुनिर खान यांनी तापसी अधिकाऱ्यांना सविस्तर जबाब दिला त्याचबरोबर त्यांच्याकडे कसे पैसे मागण्यात आले, कोणी पैसे मागितले, कोणच्या वतीने पैसे मागितले, यात परमबीर सिंग, प्रदीप शर्मा यांची काय भूमिका होती याची सविस्तर माहिती दिली.