CAA राज्यातील जनतेचे हक्क कुणालाही हिरावून देणार नाही : CM उध्दव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात अशांततेचे वातावरण पसरलेले आहे. आता महाराष्ट्रातही या कायद्याचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असून विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत असून जनतेचे हक्क कुणालाही हिरावू देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती करतोय. संसदेत नागरिकत्त्व कायदा मंजूर झाला आहे. त्या कायद्याबद्दल देशात अशांतता आणि गैरसमज पसरला आहे. देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं देखील होतं आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसाचार उसळला असून आंदोलन, मोर्चे निघत आहेत. महाराष्ट्रातील जनतेनं मनात कोणतेही गैरसमज करून घेऊ नये. हा कायदा योग्य आहे की नाही याबद्दल सुप्रीम कोर्टात निर्णय होणार आहे” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या कायद्यामुळे देशातून कुणाला हाकलून देण्यात येईल असा गैरसमज कुणीही करू नये असे सांगत महाराष्ट्र सरकार हे जनतेचं हित जपणारं सरकार आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले.

परभणीत आंदोलकांनी फोडली अग्निशमन दलाची गाडी
नागरिकत्त्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं आणि मोर्चे निघाली. एकूणच राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आज परभणीत आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी फोडली आहे. तसेच बीड शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दगडफेक करण्यात आली असून हिंगोली जिल्ह्यात तीन एसटी बसवर दगडफेक करून जाळपोळीचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्यात होणाऱ्या या हिंसक घटनांना कुठेतरी आळा बसावा यासाठी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला आहे. परिणामी राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने सध्या देशात होत आहेत.

दरम्यान, परभणीत मुस्लिम समाजाच्या वतीने मोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला. परभणी शहरातील ईदगाह मैदानापासून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने आपला सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोदी-शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मोदी सरकारने जाणीवपूर्वक मुस्लिम समाजात अशांतता पसरावी या उद्देशाने हा कायदा आणला असल्याचा आरोप केला. तसेच मुस्लिम समाजाला मोदी सरकार घाबरवत आहे असा देखील आरोप यावेळी मोर्चेकऱ्यांनी केला. तसेच या मोर्चात मुस्लिम समाजाऐवजी इतर समाजाच्या लोकांनीही सहभाग नोंदविला.

या मोर्चाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, मुस्लीम समाजाच्या हिरव्या झेंड्यासोबत, भगवा, निळा, पिवळा आणि अन्य रंगाचे झेंडे आंदोलनात दिसले. तसेच संविधान बचावाच्या घोषणाही देण्यात आल्या आणि एनआरसी कायद्याला विरोध करणारे वेगवेगळे फलक देखील यावेळी युवकांकडून झळकावण्यात आले. या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरा जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/