‘फ्लिपकार्ट-अमेझॉन’च्या फेस्टिव्हल ऑफर्स होणार बंद ? ‘CAIT’चं मोदी सरकारला ‘लेटर’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठ्ठा डिस्काउंट मिळत असल्याने ग्राहक स्थानिक बाजारपेठेकडे पाठ फिरवत आहेत. याला वैतागून यावर्षीच्या सणाच्या हंगामात ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑफर योजनेवर बंदी घालण्याची मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी सरकारला पत्र लिहून केली आहे. सीएआयटीने म्हटले आहे की बंपर सवलतीच्या नावाखाली ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांची दिशाभूल करीत आहेत.

फ्लिपकार्टने ‘द बिग बिलियन डेज’ विक्रीच्या तारखा जाहीर केल्याच्या काही दिवसानंतर व्यापाऱ्यांचा हा प्रतिसाद आला. फ्लिपकार्टशिवाय व्यापाऱ्यांनी त्याच्या प्रतिस्पर्धी अ‍ॅमेझॉन आणि अशा प्रकारच्या इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या सणासुदीच्या सीझन विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

अलीकडेच फ्लिपकार्टने जाहीर केले की दिवाळी आणि दसर्यापूर्वी यावर्षी ६ दिवसांची विक्री २९ सप्टेंबरपासून सुरू होईल. अ‍ॅमेझॉनकडून त्याच्या वार्षिक बंपर विक्रीच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही.

काय म्हटले आहे पत्रात :
सणाच्या काळात भारतीय मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या उत्सवाच्या दिवशी ग्राहकांना मोठी सूट देतात. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात सीएआयटीने म्हटले आहे की, या कंपन्या त्यांच्या ई-कॉमर्स पोर्टलवर १० ते ८० टक्क्यांपर्यंत मोठी सूट देऊन किंमतीं कमी ठेवतात. कंपन्यांद्वारे दिले जाणारे डिस्कॉउंट्स हे समानता धोरणांचे उल्लंघन आहे. सीएआयटीने म्हटले आहे की सणाच्या हंगामात विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात सवलत देणे परकीय थेट गुंतवणूक (FDI) नियमांच्या विरोधात असते.

व्यापाऱ्यांच्या संघटनेने बाजू मांडताना म्हटले आहे, हे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उघडपणे एफडीआयच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. उत्सवाच्या वेळी लावलेल्या या डोसकाऊण्टवर बंदी घालण्याचा आदेश देण्यात यावा. या कंपन्या एफडीआयच्या नियमांचे पालन कसे करतात याचीही चौकशी केली पाहिजे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.