WB Election : ममता बॅनर्जींना मुख्यमंत्री बनण्यासाठी करावं लागेल ‘हे’ काम, जाणून घ्या कायद्यातील तरतुदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. यामध्ये भाजप पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत ममता बॅनर्जीच्या तृणमूल पक्षाने चांगले घवघवीत यश मिळवत पुन्हा एकदा गड राखला आहे. विशेष म्हणजे गड आला पण सिंह गेला अशी गत बंगाल मध्ये दिसून आली. अर्थात ममता बॅनर्जींना नंदीग्राम मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. अवघ्या शेवटच्या क्षणी काही माताधिक्यांनी ममता यांचा पराभव झाला आहे. तर तेथून टीएमसीचे बंडखोर नेते आणि भाजपचे उमेदवार शुवेंदु अधिकारी हे निवडून आले आहेत.

पश्चिम बंगाल मध्ये टीएमसीची सत्ता आली आहे. मात्र मुख्यमंत्री ममता यांचा पराभव झाला आहे. तर ममता ह्या बंगालच्या मुख्यमंत्री कायम राहणार का? असा प्रश्न घोंगावत आहे. तर यावरून निवडणूक तज्ज्ञांचं असं मत आहे की, ममता बॅनर्जी निश्चितपणे पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी राहतील. कारण देशातील ३ सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री नितीशकुमार, योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेचे सदस्य आहेत परंतु विधानसभेचा भाग नाहीत. तरीही ते मुख्यमंत्री आहेत. मुख्यतः म्हणजे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी विधानसभा निवडणुका जिंकल्या नाहीत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कधीही सार्वत्रिक निवडणूक लढविली नाही. परंतु, पश्चिम बंगाल राज्यात विधानपरिषद नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याबाबतीत असं नाही. तरी देखील तृणमूल काँग्रेसने अशी रचना तयार करण्याविषयी बोललं आहे.

कलम १६४ या कलमानुसार जो मंत्री सलग ६ महिने एखाद्या राज्याच्या विधानसभेचा भाग नसतो तो या कालावधीची मुदत संपल्यानंतर मंत्री होऊ शकत नाही. म्हणजेच ममता बॅनर्जी यांना आमदार होण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी आहे. पश्चिम बंगाल राज्यात विधानपरिषद नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांना ६ महिन्यांत एखाद्या रिकाम्या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल आणि पोट-निवडणूक जिंकून आमदार व्हावे लागेल.