भीषण कार अपघातात आई- वडिल जागीच ठार, तर मुलाची मृत्यूशी झुंज

दर्यापूर (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव कारच्या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्या दाम्पत्याचा 16 वर्षीय मुलगा व चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि. 21) रात्री11 सुमारास दर्यापूर-अकोला मार्गावरील तोंगलाबाद-सौंदळी फाटा मार्गावर हा अपघात घडला. अपघात नेमका कसा झाला, याबाबत समजू शकले नाही. मात्र, कारची अवस्था पाहता, त्यांचे वाहन समोरच्या एखाद्या मोठ्या वाहनावर मागून आदळले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

विजय खंडारे वय 48 व वृषाली विजय खंडारे (45 रा. जागृती कॉलनी, बनोसा, दर्यापूर) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. तर पार्थ विजय खंडारे (16) वाहनचालक मंगेश घोडस्कर (38 रा. दर्यापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दिलीप एजन्सीचे संचालक असलेले विजय खंडारे हे पत्नी आणि पार्थ आणि अंशु (5) या दोन मुलांसह सोमवारी रात्री 11 च्या सुमारास अहमदनगरजवळ मंगळवारी होणाऱ्या महानुभावपंथीयांच्या एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कारने (एमएच 24 एआर 8259) कारने दर्यापूरहून निघाले होते. दर्यापूरहून 12 किलोमीटर अंतरावरील तोंगलाबाद-सौंदळी फाट्यानजीक त्यांच्या कारला अपघात झाला. यात मागील सीटवर बसलेल्या खंडारे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.

पार्थची मृत्यूशी झुंज
अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेला विजय खंडारे यांचा मोठा मुलगा पार्थ हा मृत्यूशी झुंज देत आहे. पाच वर्षांचा अंशु हा नातेवाइकांना ‘आई बाबा कुठे गेले? मला त्यांच्याजवळ जायचे आहे, असा आग्रह धरत आहे. तुझे आईबाबा आता दूरच्या प्रवासाला निघून गेलेत, ते आता नाही परतणार, हे त्या अबोध चिमुकल्याला सांगायचे तरी कसे, अशी शोकविव्हळ परिस्थिती आप्तांवर येऊन ठेपली आहे.