साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गाजर वाटप

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सदर निधीचे भाजपकडून सातरकरांना दाखवलेले गाजर आहे. अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कार्यक्रमस्थळाजवळ जिल्‍हा परिषद चौकात गाजर वाटप करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रस्त्यावर कांदे टाकत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजस शिंदेंनी आंदोलन केलं. अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झाली असून कांद्याला चांगला दर मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. तसंच कांद्याला दिलेलं 200 रुपयांचं अनुदान मान्य नाही, असं म्हणत यासाठी वाढीव मदतीची मागणी राष्ट्रवादीच्या या आंदोलनात करण्यात आली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे २०० रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला आहे. अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा देण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कांद्यावर अनुदान मिळणार आहे, पण त्याचवेळी 200 क्विंटलची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ‘येत्या काळात कांदा वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा आणि कांद्यावर प्रक्रिया करण्यासाठी काही करता येईल का, याबाबत सरकारचा विचार सुरू आहे,’ अशी माहिती कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती.