खारघरमधील भाजप नगरसेवकावर FIR दाखल

खारघर : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचे (covid 19) संकट मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्य सरकारने विविध प्रतिबंध लागू केले आहेत. गर्दी करण्यासदेखील मनाई केलेली आहे. परंतु काहीजण या नियमांचे पालन करताना दिसून येत नसून मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. त्याचबरोबर वाढदिवस साजरा करत असतानादेखील गर्दी होताना दिसत आहे. अशाच प्रकारची एक घटना नवी मुंबईमध्ये घडली असून, येथील भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्ताने मित्रांसमवेत पार्टी करणाऱ्या खारघरमधील भाजपचे नगरसेवक नीलेश बाविस्कर (nilesh baviskar) यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. नगरसेवक नीलेश बाविस्कर (bjp corporatar) हे खारघरमधील सेक्टर 15 परिसरातून निवडून आलेले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वत्र जमावबंदी लागू आहे. संचारबंदी असल्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कामाखेरीज वावरता येत नाही. त्यामुळे सरकारने नागरिकांवर प्रतिबंध घातलेले असतानादेखील या नगरसेवकाने वाढदिवसाची पार्टी आयोजित करून या नियमांचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी दिली.

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांना वेगळे नियम आणि लोकप्रतिनिधींना वेगळे नियम आहेत का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला होता. त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली आहे.