मतदानापूर्वी ज्येष्ठ भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश

इंदूर : वृत्तसंस्था –एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची सांगता झाली आहे. प्रचार समाप्तीनंतर मतदारांना आकर्षीत करण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवत आहेत. तर मतदार संघामध्ये मतदारांसाठी वैध-अवैध मार्गाचा अवलंबण्यास सुरुवात केली आहे.

मतदानाला एक दिवस शिल्लक असताना भाजपच्या एक जेष्ठ नेते देवराज सिंह परिहार यांच्या गाडीमध्ये कॅश सापडल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. मात्र पोलिसांनी सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळे देवराज सिंह यांना घटनास्थळावरून जाऊ दिले. असा आरोप करत काँग्रेसने रास्ता रोको केले.  मध्य प्रदेशात सध्या भाजप आणि काँग्रेसमध्ये अतितटीची लढत आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले देवराज सिंह परिहार हे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे उपाध्यक्ष आहे. त्यांना मध्य प्रदेश सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. पोलीस अधिकारी मानसिंह परमार यांनी सांगितले की, सांवेर विधानसभा मतदारसंघातील हतुनिया फाटा येथे परिहार यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 2 लाख 60 हजार रुपये आढळले.

पोलीस घटनास्थळी चौकशी करत असतानाच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी परिहार यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. तिथे निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणाचा फायदा घेऊन परिहार आणि त्यांचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाले. असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, परिहार हे मतदारांना पैसे देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते निलाब शुक्ता यांनी केला आहे.