राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर दबाव आणू नये : रामदास आठवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राम मंदीर बांधण्यासाठी केंद्र शासनावर ऑर्डिन्स काढण्याबाबत दबाव आणू नये, भारतीय जनता पक्षाने मुस्लिम समाजाच्या भावनांचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले. आरपीआयच्या वतीने आयोजित केल्या जाणा-या विविध कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

यावेळी आरपीआयचे शहर अध्यक्ष मिलिंद कांबळे,पुण्याचे उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे आदी उपस्थित होते.

राम मंदीराबाबत येत्या जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून हा निकाल हिंदू व मुस्लिम या दोन्ही बांधवांना न्याय देणारा असेल. त्यामुळे बेकायदेशीरपणे मंदीर बांधू नये,सर्वांनीच थोडे सबुरीने घ्यावे, असा सल्ला देखील आठवले यांनी दिला. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आयोध्या दौराबाबत बोलताना आठवले म्हणाले, भारतीय जनता पक्षाची मुस्लिम आघाडी असून अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या पाठीशी आहे. त्यामुळे दोंंन्ही पक्षांनी राम मंदीर बांधण्याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहावी. मुस्लिम समाजावर दबाव आणून राम मंदीर बांधू नये. तसेच आयोध्येत राम मंदीर, मशीद आणि बौध्द विहारासाठी सुध्दा जागा उपलब्ध करून द्यावी. सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून मी स्वत: आयोध्येला जाणार आहे. तसेच आयोध्येमधील हिंदू व मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधून यावर सामोपचाराने मार्ग काढण्याबाबत चर्चा करणार आहे. मशीदीच्या जागेवर एखादी शैक्षणिक संस्था सुरू करता येईल का? याबाबत संवाद साधणार आहे. आयोध्येतील वादग्रस्त जागा सोडून बौध्द विहारासाठी सुध्दा इतर ठिकाणी जमीन उपलब्ध करून द्यावी, या बाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, असेही आठवले म्हणाले.

राम मंदिर मुद्द्यावरून मोदींनी साधला काँग्रेसवर निशाणा

आरपीआयतर्फे आयोजित केल्या जाणा-या विदर्भ मेळाव्याबाबत बोलताना आठवले म्हणाले, येत्या 20 जानेवारी रोजी नागपूर येथे विदर्भ मेळावा आयोजित केला आहे. त्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जाणार असून भूमिहिनांना जंगलाच्या जमिनीचे वाटप करावे, अशी मागणी करणार आहे. तसेच येत्या 10 फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथे आरपीआयकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.