विरोधकांच्या आरोपानंतर केंद्र सरकारकडून ‘सीरम’ आणि ‘भारत बायोटेक’ला लसीचे दर कमी करण्याच्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गाचा दिवसेंदिवस उद्रेक होताना पहायला मिळत आहे. दररोज लाखांच्या संख्येने कोरोनाबाधित वाढत आहेत. तसेच रुग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी भर पडत आहे. परिणामी आरोग्ययंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे देशभरात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेत देखील लस तुटवड्यामुळे काहीसे अडथळे येताना दिसून येत आहेत. दरम्यान, जगभरातील खुल्या बाजारपेठेच्या तुलनेत कोविड-19 विषाणूवरील लशींची किंमत भारतात अधिक असल्याचे दिसून येत आहे. इतर देशांत लशींच्या किमती खुल्या बाजारात खूपच कमी आहेत. या पार्श्वभूमीवर आता भारत सरकारने सीरम आणि भारत बायोटेकला लसीची किंमत कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासाठी लस उत्पादक सीरम आणि भारत बायोटेकला लसीचे 50 टक्के उत्पादन हे राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकण्याची परवानगी दिली. यानंतर सीरमने आपल्या कोविशिल्ड या लसचे दर राज्ये व खुल्या बाजारासाठी जाहीर केले. राज्यांसाठी 400 रुपये प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रतिडोस असा दर निश्चित केले.

सीरमने लसीचे दर जाहीर केल्यानंतर भारत बायोटेकनेही जवळपास सीरम प्रमाणे लसीचे दर जाहीर केले. भारत बायोटेकने आपल्या कोवॅक्सिन या लसचे दर जाहीर करत राज्य सरकारला ही लस खरेदी करायची असल्यास प्रत्येक डोससाठी 600 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचवेळी खासगी रुग्णालयांसाठी म्हणजे खुल्या बाजारात हा दर प्रतिडोस 1200 रुपये इतका असणार आहे. तर निर्यात होणाऱ्या लसचा दर प्रत्येक डोससाठी 15 ते 20 डॉलर म्हणजे 1 हजार 123 ते 1 हजार 498 रुपये इतका असणार आहे.

सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरावरुन वाद निर्माण झाला आहे. तसेच केंद्र सरकारच्या धोरणावरही विरोधकांकडून टीका होत आहे. लसीच्या दरावरुन होत असलेल्या आरोपानंतर आता केंद्र सरकारने सीरम आणि भारत बायोटेकला आपल्या लसींचे दर कमी करण्याच्या सूचना केल्याचे सुत्रांनी सांगितले आह. देशात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार आहे. अशा परिस्थिती सीरम आणि भारत बायोटेकने आपल्या लसचे दर कमी करावेत, अशा सूचना केंद्र सरकारने दोन्ही कंपन्यांना दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.