‘चला हवा येऊ द्या’च्या कलाकारांना पुणेकरांची टाळ्या-शिट्ट्याची दाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कधी गमती जमती तर कधी खट्याळ विनोद… कधी सेटवरच्या गप्पा तर खळखळून हसविणारे विनोदी किस्से अशा अनोख्या हास्य जत्रेने पुणेकर प्रेक्षकांची मने जिंकली. ‘चला हवा येऊ द्या- होवू दे व्हायरल’च्या पूर्ण चमूने पुण्यात येवून प्रेक्षकांना खळखळून हसविले, आणि पुणेकर प्रेक्षकांनी त्यांच्या विनोदाला टाळ्या-शिट्ट्याची दिलखुलास दाद दिली.

आयडियल कॉलनी येथील मैदानावर ‘कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे’ आयोजन संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसरा दिवस ‘चला हवा येवू द्या’च्या टीमने गाजविला. डॉ. निलेश साबळे, भालचंद्र कदम उर्फ भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, अंकुर वाढवे, योगेश शिरसाट या कलाकारांनी आपल्या विनोदाद्वारे उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांचे व्यासपीठावर आगमन होताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर थुरकटवाडीवाडीवरून थेट रंगलेल्या या कार्यक्रमात उपस्थित कलाकारांची धमाल प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहता व अनुभवता आली. आजच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

यावेळी गायक महेश काळे, पी. एन. गाडगीळ ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, रावेतकर हौसिंगचे अमोल रावेतकर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटीव्ह सोसायटीचे हर्षद झोडगे, लाकडी घानाचे भावना व आनंद पटेल, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आज ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील सुबोध भावे, गायत्री दातार, अभिज्ञा भावे, आशुतोष गोखले, क्रांती फुले, विद्या करंदीकर आदी कलाकार यावेळी उपस्थित होते. यानिमित्ताने गायिका आर्या आंबेकरने सादर केलेल्या गीतांनी कार्यक्रमात रंग भरला.

यावेळी बोलताना सुबोध भावे म्हणाले की, पुण्यात अस्सल कलाकारांचे नेहमीच कौतुक होते. हीच उर्जा प्रेक्षकांसमोर नवीन काही तरी करण्याची ताकद देत असते. एखादी भूमिका करताना ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये त्या कलाकाराबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल उत्सुकता निर्माण होते. कुठे तरी हेच प्रत्येक कलाकाराला अपेक्षित असते. तोच आनंद आणि प्रेक्षकांचे प्रेम मी सध्या अनुभवत आहेत.

डॉ. निलेश साबळे म्हणाले की, पुण्यातील कोथरूडमध्ये टाळ्या वसूल करणे हे प्रत्येक विनोदी कलाकारासाठी महत्वाचे असते. हीच दाद मिळावी म्हणून आम्ही नेहमीच पुण्यात कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच पुण्यात कार्यक्रम सादर केल्याचा आनंदच काय और असतो.