केरळनंतर आता पंजाबमध्ये सापडला ‘कोरोना’ चा संशयित ‘रूग्ण’, 10 दिवसांपुर्वीच कॅनडाहून ‘चीन’ मार्गे परतला होता भारतात

चंदीगड : वृत्तसंस्था – जीवघेणा कोरोना व्हायरस आता चीनमधून भारतात पोहचला आहे. केरळमध्ये याचे तीन रूग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पंजाबमध्ये एक संशयित रूग्ण सापडल्याचे प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंजाबच्या फरीदकोटमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला संशयास्पद रूग्ण सापडला आहे. हा रूग्ण 42 वर्षांचा असून त्याचे नाव गुरजिंदर सिंह आहे. गुरजिंदर हे 10 दिवसांपूर्वी 26 जानेवारीला चीनहून कॅनडा आणि कॅनडाहून भारतात आले होते.

हा रूग्ण वैद्यकीय तपासणी आणि औषधे घेण्यास नकार देत आहे. यामुळे पोलीससुद्धा या प्रकरणात लक्ष देत आहेत. सध्या या रूग्णाला वैद्यकीय तपासणीसाठी तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

केरळात कोरोना व्हायरस राज्य आपत्य घोषीत
केरळामध्ये कोरोना व्हायरसचे तीन पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यानंतर राज्याने यास राज्य आपत्ती जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी हे आदेश दिले. केरळात कोरोना व्हायरसने ग्रस्त असलेले तीन रूग्ण हे विद्यार्थी आहेत आणि काही दिवसांपूर्वीच ते चीनच्या वुहान शहरातून परतले होते.

चीन आणि कोरोना व्हायरस प्रभावित देशांचा प्रवास केलेल्या केरळमधील 1,999 लोकांना देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. यापैकी बहुतांश रूग्णांना स्पेशल वार्डमध्ये ठेवण्यात आले आहे. तर 75 लोकांना वेगवेगळ्या रूग्णालयात ठेवण्यात आले आहे.

भारतीय नागरिकांना केले एयर लिफ्ट
चीनमध्ये हाहाकार उडवणार्‍या कोरोना व्हायरसचा धोका संपूर्ण जगाने घेतला आहे. चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना भारत परत आणत आहे. शनिवारी एअर इंडियाच्या स्पेशल फ्लाइटने चीनमधून 324 भारतीयांना आणण्यात आले. पुन्हा रविवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाने 323 भारतीयांना आणण्यात आले.

चीनमध्ये आतापर्यंत 425 लोकांचा मृत्यू
कोरोनामुळे चीनमध्ये आतापर्यंत 425 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हजार पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. जगभरात हा व्हायरस पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने यास जागतिक आरोग्य आपत्ती जाहीर केले आहे. अनेक देशांनी चीनसाठीची उड्डाणे बंद केली आहेत.