अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सुरू असलेली चॅप्टर केस मुंबई पोलिसांना अखेर शनिवारी (दि. 10) बंद करावी लागली आहे. 6 महिन्यांच्या कालावधीत निकाल देण्यास असमर्थ ठरल्याने पोलिसांना हा निर्णय घ्यावा लागला. याबाबतचा आदेश सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी दिला आहे. चॅप्टर केस ही 6 महिन्यांत निकाली काढणे बंधनकारक आहे. मात्र याप्रकरणी 6 महिन्यांत चौकशी पूर्ण न झाल्यामुळे गोस्वामी यांच्या वकिलाने चॅप्टर केस रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही सुनावणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोस्वामींना मोठा दिलासा मिळाला आहे.

पालघर हत्याकांड आणि वांद्रे स्थानकातील स्थलांतरित श्रमिकांच्या गर्दीबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्यामुळे गेल्या वर्षी 10 ऑक्टोंबर रोजी ही चॅप्टर केस सुरु केली होती. वरळी न्यायालयाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त सुधीर जांबवडेकर यांनी गोस्वामीवर फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कारवाई सुरू केली होती. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत भविष्यात असे होऊ नये म्हणून बाँड का लिहून घेऊ नये, याबाबत विचारणा केली होती. या घटनेला गोस्वामींनी जातीय रंग देऊन हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीय तणाव भडकविण्याचा प्रयत्न केल्याचे या नोटिसीत म्हटले होते. तसेच या कव्हरेजमुळे वांद्रे स्थानकात गर्दी उसळली. याप्रकरणी गोस्वामी यांच्याविरोधात ना. म. जोशी मार्ग आणि पायधुनी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या प्रस्तावानंतर सदर कारवाई सुरु केली होती. असामाजिक घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून चॅप्टर केस घेतली जाते. या चॅप्टर केसची सुनावणी सहा महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक असते.