केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटला, पुण्याहून सोलापूरला जाणारी वाहतूक बंद

दौंड/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे सोलापूर महामार्गावर केमिकलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला आहे. यामुळे पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. कुरकुंभ एमआयडीसी जवळ केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटला आहे. टँकर महामार्गावरुन बाजूला करताना आग लागण्याची शक्यता असल्याने पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी सहा क्रेन आणि अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असण्याची शक्यता असल्याने पलटी झालेला टँकर बाजूला करण्यासाठी क्रेन आणि अग्निशमन दलाची मदत घेतली जात आहे. टँकर बाजूला घेत असताना टँकरने पेट घेऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

या अपघातानंतर पुण्याकडून सोलापूरला जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. तर सोलापूरकडून पुण्याकडे येणारी वाहतूक सर्व्हिस रोडने सुरु आहे. टँकरमध्ये ज्वलनशील केमिकल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे. टँकर लवकरात लवकर महामार्गावरुन बाजूला करुन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हा टँकर कसा पलटा याची माहिती मिळू शकली नाही.