‘फी’ न भरल्याने विद्यार्थिनिस केले नापास, छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – एक विद्यार्थीनी फी भरू न शकल्याने शाळा प्रशासनाने तिला नापास केले. तसेच तिचा दाखल देण्यासही टाळाटाळ करण्यात येत आहे. याप्रकरणाची दखल छावा संघटनेने घेतली असून शाळा प्रशासन व त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने जिल्हा परिषदे समोर उपोषण केले. या विद्यार्थिनीला शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी या उपोषणाला देशभक्त पार्टी, रयत प्रतिष्ठान व मानवता जन आंदोलनाच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.

राहाता तालुक्यातील टिळकनगर येथील डहाणूकर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मेघना पठारे ही विद्यार्थीनी इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. या विद्यार्थिनीची शैक्षणिक फी थकली म्हणून तीला दोन विषयात नापास करण्यात आले. या संदर्भात तीच्या पालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणानंतर पठारे कुटुंबीयांनी आपल्या मुलीस सदर शाळेतून काढून श्रीरामपूर तालुक्यातील बी. जे.  काचोळे विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र या विद्यार्थिनीचा दाखला देण्यास डहाणूकर इंग्लिश मिडीयम स्कूल तयार नाही. यामुळे विद्यार्थिनीला दहावी एसएससी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरता येत नसल्याने तीचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

पठारे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, डहाणुकर इंग्लिश मिडीयम स्कूलने १ लाख २४ हजार सहाशे रुपयाची सदर कुटुंबीयांकडे लेखी स्वरुपात मागणी केली आहे. सातत्याने विद्यालयाकडून पठारे कुटुंबीयांना फी ची मागणी करुन त्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार चालू आहे. याचा विद्यार्थिनीच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. विद्यालयात सर्व विद्याथ्र्यां समोर सदर विद्यार्थिनीस फी साठी वारंवार बोलणे, शिक्षा करणे व अंतर्गत गुण कमी देऊन, तीला नापास करण्याची धमकी देण्यात आली असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.