‘हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हाफिज सईदच्याविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात कधीच नव्हती असं वक्तव्य देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलं आहे. अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार केलं होतं. अशीच काही कारवाई करून भारतानं हाफिज सईदचा खात्मा करावा, अशा चर्चा देशात अनेकदा होत असताना पी. चिदंबरम यांनी यावर भाष्य केलं आहे.

भारत मुंबईवरील २६/११ हल्ल्यानंतर हाफिज सईद कराचीतल्या सुरक्षितस्थळी होता. आता तर तो दिवसाढवळ्या अगदी मोकाट फिरतो. अमेरिकेनं अबोटाबादमध्ये घुसून ओसामाला कंठस्नान घातलं होतं. मात्र आपल्याकडे तशी क्षमता नाही,’ असं चिदंबरम म्हणाले.  चिदंबरम यांच्या या विधानामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात. भारत मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा कट रचणाऱ्यांचा खात्मा करु शकतो. अमेरिकेनं लादेनविरोधात जशी कारवाई केली. त्याच प्रकारची कारवाई करण्याची क्षमता भारतामध्येही आहे, असं विधान काही तासांपूर्वी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी केलं होतं. यानंतर चिदंबरम यांनी हाफिजबद्दल विधान केलं.

‘आपल्याकडे तेव्हादेखील (२००८ मध्ये) तशी क्षमता नव्हती आणि आपल्याकडे आज तशी क्षमता असेल, तर ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेल. आम्ही अमेरिकेसारखी कारवाई करायचा प्रयत्न केला असता, तर आम्हाला अपयश आलं असतं आणि त्याचा मोठा फटका बसला असता,’ असं चिदंबरम यांनी पुढे म्हटलं. ‘आम्ही त्यानंतर कूटनिटीचा वापर करुन पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला. २६/११ सारखा दुसरा हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा संदेश आम्ही कूटनितीच्या माध्यमातून पाकिस्तानला दिला होता,’ असं चिदंबरम म्हणाले.