सरन्यायाधीशांवर दबाव, म्हणून पत्रकार परिषद घेतली होती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आम्हा चारही न्यायमूर्तीना तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर बाहेरील लोकांकडून काहीतरी दबाव असल्याची शंका होती. त्यामुळेच आम्ही जाहीर पत्रकार परिषद घेतल्याचा खुलासा या चौघांपैकी एक असलेल्या न्यायमूर्ती कुरियन जोसेफ  यांनी केला आहे.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी १२  जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेतली होती. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेत कोर्टाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले होते. या चौघांपैकी एक असलेल्या न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी पत्रकार परिषदेच्या आयोजनासंबंधी मोठा खुलासा केला आहे.
चारही न्यायमूर्तींना तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर बाहेरील लोकांकडून काहीतरी दबाव होता अशी शंका होती. आम्ही सरन्याधीशांना पत्र लिहून न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याबाबत आग्रह केला होता. मात्र स्थिती बदलली नाही, त्यामुळेच आम्ही पत्रकार परिषद घेतली, असे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ यांनी सांगितले आहे.
न्यायमूर्ती जोसेफ यांनी सांगितले की, महत्वाच्या केसेस अशा न्यायाधीशांकडे दिल्या जात होत्या, ज्यांच्या राजकीय संबंधाच्या चर्चा सर्वत्र होत्या. आम्हाला ही गोष्ट योग्य वाटली नाही. न्यायपालिकेची विश्वासार्हता जपण्यासाठी आम्हाला समोर येणे गरजेचे होते.
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, ही केवळ एकच घटना नव्हती. अशा अनेक घटनांमध्ये बाहेरील हस्तक्षेप होत होता. ज्या दिवशी आम्ही पत्रकार परिषद घेतली, त्या दिवशी लोयांच्या केसची एका खास बेंचसमोर सुनावणी होती. बाहेरील हस्तक्षेप हा राजकीय होता की अन्य काही, यावर मी बोलू शकत नाही मात्र सरन्यायाधीशांचे अनेक प्रशासकीय निर्णय त्यांच्या स्वातंत्र्यावर कुणाचा तरी दबाव आणून घेतल्यासारखे वाटत होते.
सुप्रीम कोटार्चा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसमोर प्रश्न मांडले, पण काहीच उपयोग झाला नाही, अशी हतबलता  देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी मांडली होती.
भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती जे चेलमेश्वर आणि न्यायमूर्ती मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेतली. विशेष म्हणजे ज्या चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली ते सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात सीनियर आहेत. न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरासमोर ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती.
पत्रकार परिषद बोलावताना आम्हाला अजिबात आनंद होत नाही. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून न्यायव्यवस्थेत जे काय सुरु आहे, ते व्यथित करणारे आहे. सुप्रीम कोर्ट प्रशासनाचे कामकाज सुरळीत होत नाही. याबाबत आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्रही लिहिले़ मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सरन्यायाधीशांना लिहिलेले पत्र सार्वजनिक करणार आहोत. आम्ही आमचा आत्मा विकला, असे आम्हाला भविष्यात कोणीही बोलू नये. न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही टिकून राहणार नाही, असे चारही न्यायमूर्ती पत्रकार परिषदेत म्हणाले होते़
गुरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणी सुनावणी करणारे विशेष सीबीआय कोटार्चे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्याबाबत आजची पत्रकार परिषद आहे का, अशी विचारणा न्यायमूर्तींना करण्यात आली. त्यावर त्यांनी होय असं सांगितले होते.