पुण्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहर उत्तम आहेच, मात्र येत्या काही वर्षात या शहराला सर्वोत्तम बनवू असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. याशिवाय पुण्याचा मागील पंधरा-वीस वर्षांपासून विकास खुंटला होता. मात्र मागील तीन ते चार वर्षात या सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊन ही विकासकामे सुरू केली आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचे दोन दिवसीय महाशिबीर कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी आयोजित केले आहे. महेश महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तेव्हा त्यांनी पुण्याबाबत वक्तव्य केले.

‘येत्या काळात पुण्याचा चेहरा बदललेला दिसेल’

यावेळी मुख्‍यमंत्री फडणवीस म्हणाले, “सध्या पुणे शहरात एकना अनेक प्रकारचे विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात या शहराचा बदललेला चेहरा पाहण्यास मिळेल. मागील साडेचार वर्षांपूर्वी छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन आम्ही सत्ता स्थापन केली होती. छत्रपतींच्या रयतेयच्या राज्याच्या सूत्रानुसार सरळ मार्गाने आमचे कार्य सुरू आहे. सामान्य लोकांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध योजना आखल्या आहेत. त्या जमिनीवर कार्यान्वित केल्यामुळे शेवटच्या घटकाला त्याचा लाभ मिळतो आहे. लोकांना अशा योजनांची गरज आहे. त्यामुळेच या योजनांना ग्रामीण भागासह शहरात ही प्रतिसाद मिळत आहे.”

‘गरजूंच्या अडचणी दूर करून त्यांना लाभार्थी बनवा’

पुढे बोलताना ते म्हणाले की, “२०२० पर्यंत प्रत्येकाला घर हे स्वप्न पूर्ण करणार आहोत. गॅस, बँक खाते, वीज, आरोग्यसेवा, मोठ्या प्रमाणात या सरकारने पुरवल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन होऊन त्यांचे जीवनमान उंचावत आहे. त्यामुळे गरजूंना प्रत्यक्ष लाभ मिळणार नाही तोपर्यंत योजनांचे माहिती देण्याचे कार्य सुरू ठेवा. त्यांच्या अडचणी दूर करून त्यांना लाभार्थी बनवा” अशा सूचना ही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, भाजपा शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते. आमदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.