मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार

मुंबई : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आग लागून त्यात १० नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यु झाल्याचे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेची दखल देशपातळीवर घेतली गेली. राज्यातील आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे दिसून आले. त्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घेऊन तातडीने आगीच्या चौकशीचे आदेश दिले होते. आज तेथ स्वत: भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. तसेच मरण पावलेल्या बालकांच्या पालकांनाही भेटणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे मुंबईहून नागपूर विमानतळावर दुपारी सव्वा बारा वाजता आगमन होणार आहे. तेथून ते हेलिकॉप्टरने भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे जाणार आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेतील भोजापूर येथील मृत शिशुंचे पालकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दीड वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. येथे वैद्यकीय शुश्रुषेत असलेल्या शिशुंच्या पालकांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला प्रयाण करणार आहेत.