एसीच्या आऊटडोअर युनिटमधून विजेचा धक्का, नागपुरात चिमुरड्याचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपुरात  स्प्लीट एसीच्या आऊटडोअर  युनिटला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का लागून सात वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. समीर मुन्शी असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. नागपूरच्या कुशीनगर भागात हुडको कॉलनीमध्ये सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुन्शी कुटुंबीयांच्या घरी पहिल्या मजल्यावरील बेडरुममध्ये पॅनसॉनिक कंपनीचा स्प्लीट एअर कंडिशनर आहे. त्याचं आऊटडोर युनिट दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवर आहे. शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी गरम होत असल्यामुळे समीरने एसी सुरु केला. थोड्या वेळानंतर आईला न सांगताच तो खेळायला गच्चीवर गेला. त्यावेळी त्याच्या हाताच्या कोपऱ्याचा आऊटडोर युनिटला स्पर्श झाला. त्यामुळे जोरदार करंट लागून तो भिंतीवरील आऊटडोर युनिट आणि भिंतीच्या मध्ये पडला.

विजेचा अत्यंत जोरदार झटका बसल्यामुळे समीरच्या नाका-तोंडातून रक्त आलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. सुमारे एक ते दीड तास कुटुंबीयांना याविषयी समजलंच नाही. ट्यूशनची वेळ झाल्यानंतरही समीर न दिसल्यामुळे त्याची शोधाशोध सुरु झाली. काही वेळानंतर दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवर समीरचा मृतदेह आढळून आला. मुन्शी कुटुंबीयांना काही महिन्यांपूर्वी हे सेकंड हँड घर खरेदी केले होतं. घराची वायरिंग नीट नसल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.