चीननं तैनात केली अण्वस्त्र हल्ला करु शकणारी H-6 बॉम्बर विमाने

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत -चीन वादावर अजूनही पडदा पडलेला नसून पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून चिनी सैन्याने पूर्णपणे माघार घ्यावी, यासाठी काल मोल्डोमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकार्‍यांमध्ये कमांडर स्तरची पाचव्या फेरीची बैठक झाली. त्याचवेळी काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने एच-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे उपग्रह फोटोंवरुन समोर आले आहे.

पँगाँग लेकपासून काशगर एअर बेस 690 किलोमीटर अंतरावर आहे. या पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे मागे हटलेले नाही. त्यामुळे तणावाची स्थिती कायम आहे. काशगर एअर बेसवर सहा शियान एच-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज आहेत. एच-6 बॉम्बर विमानाचे वैशिष्टय म्हणजे ही विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम आहेत. लडाखपासून 600 किमी अंतरावर हा विमानतळ आहे.

सहा हजार किलोमीटर हा एच-6 विमानांचा पल्ला आहे. त्याशिवाय 12 शियान फायटर बॉम्बर आणि चार फायटर विमाने तैनात केली आहेत. उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आता बटालियनची तैनाती केली आहे. लडाख क्षेत्राबाहेर झालेली ही पहिली तैनाती आहे. मागच्या काही आठवड्यांपासून या भागात चिनी सैन्याच्या हालचाली दिसत होत्या. लिपूलेख पास, उत्तर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या नियंत्रण रेषेजवळील भागांमध्ये चिनी सैनिकांची संख्या वाढली आहे असे वरिष्ठ लष्करी कमांडर्सनी सांगितले.