अरुणाचल प्रदेश भारतीय सीमेमध्ये दाखवणारे हजारो जागतिक नकाशे चीनकडून नष्ट

बीजिंग : वृत्तसंस्था – अरुणाचल प्रदेशवर चीन पूर्वीपासून दावा करत आला आहे. अरुणाचलबाबतची चीनची मनमानी सुरूच आहे. तैवानला स्वतंत्र देश आणि अरुणाचल प्रदेशला भारतामध्ये दाखवणारे जवळपास ३० हजार जागतिक नकाशे चीनकडून नष्ट करण्यात आले. मागच्या आठवडयात चीनच्या इशान्येकडील शहरात सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी हे नकाशे नष्ट केले.

अरुणाचल प्रदेश आपला भूभाग असल्याचा चीनचा दावा आहे. चीन अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटला हिस्सा मानतो. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लिशमध्ये असलेले हे नकाशे अनहुई प्रांतातील एका चिनी कंपनीने बनवले होते. सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी चीनच्या शेडोंग प्रांतातील किंगदाओ शहरातील कंपनीच्या कार्यालयावर छापा मारुन ८०० बॉक्स जप्त केले. त्यामध्ये २८,९०८ जागतिक नकाशे होते. जप्त केलेले साहित्य गुप्त ठिकाणी नेऊन नष्ट करण्यात आले. मागच्या काही वर्षातील अशा प्रकारची करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. प्रादेशिक अखंडता कायम ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले.

काय आहे अरुणाचल प्रदेशचा वाद ?

उत्तर पूर्व राज्य अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचं चीन मान्य करत नाही. या सीमाप्रश्नासंबंधी दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत २१ वेळा चर्चा झाली आहे. भारत-चीन वादात ३४८८ किमी लांबीच्या Line of Actual control चा समावेश आहे.