China : ‘आईस्क्रीम’मध्ये ‘कोरोना’ आढळल्यामुळं उडाली ‘खळबळ’, 3 नमुने निघाले ‘पॉझिटिव्ह’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरस (Coronavirus) ने गेल्या 14 महिन्यांपासून जगात खळबळ माजवली आहे. या विषाणूबद्दल आता आणखी भितीदायक बातम्या येत आहेत. ताजी बातमी चीनमधील (China) आहे, जिथे आईसक्रिम (Ice cream) मध्ये कोरोना विषाणू सापडला आहे. आतापर्यंत तीन नमुने सकारात्मक असल्याची पुष्टी केली गेली आहे. चिनी (China) वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार, आईस्क्रीम ज्या मिल्क पावडरपासून बनवली गेली होती ती न्यूझीलंड आणि युक्रेनमधून आली होती. सध्या आईस्क्रीमच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, सर्व जुन्या आणि नवीन स्टॉकची चाचणी घेण्यात येत आहे.

हे प्रकरण उत्तर चीनच्या तियानजीन म्युनिसिपल कॉर्पोरेशन परिसरातील आहे. जेथे कोविड -19 साथीच्या विरूद्ध काम करणार्‍या अधिकाऱ्यांना तीन आईस्क्रीमच्या नमुन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला आहे. असे म्हटले जाते की ही आइस्क्रीम बनविणार्‍या डॅक्विडो फूड कंपनीचे बरेच कर्मचारी या आईस्क्रीम बॉक्सच्या संपर्कात आले होते. कंपनीत कार्यरत असणाऱ्या सर्व 1662 कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवले जात आहे. तसेच या सर्वांच्या कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 700 कर्मचाऱ्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे.

काय म्हणत आहेत डॉक्टर?

फॉक्स न्यूजशी बोलताना लीड्स विद्यापीठाचे व्हायरॉलॉजिस्ट डॉ. स्टीफन ग्रिफिन म्हणाले की, सध्या आईस्क्रीममध्ये संक्रमण पोहोचल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. ते म्हणाले, असे देखील होऊ शकते की हा विषाणू एखाद्या संक्रमित व्यक्तीकडून आला असावा. या व्यतिरिक्त, डॉ. स्टीफन असेही म्हणाले की, ज्या चिनी कंपनीत ही आईस्क्रीम बनविली जात आहे तेथे हायजिनची कमतरता असू शकते. ते पुढे म्हणाले की, आईस्क्रीमला थंड तापमानावर ठेवले जाते आणि त्यामुळे यात विषाणू जिवंत राहण्याची शक्यता वाढते.

सतत घेतल्या जात आहेत चाचण्या

ग्लोबल टाईम्सच्या म्हणण्यानुसार, जे-जे लोक या आईस्क्रीम विक्रीच्या व्यवसायात गुंतलेले होते त्या सर्वांची देखील चाचणी केली जाईल. याशिवाय त्या सर्व गोष्टींची चाचणी केली जात आहे, ज्यांपासून आईस्क्रीम बनते. असे म्हटले जात आहे की आतापर्यंत 4836 बॉक्सपैकी 2089 आईस्क्रीम बॉक्स सील करण्यात आली आहेत.