नेपाळनं UNSC मध्ये केलं भारताच्या सदस्यत्वाचं समर्थन, चीनचा जळफळाट

पोलीसनामा ऑनलाईनः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील(United Nations Security Council) भारताच्या स्थायी सदस्यत्वाचे नेपाळने समर्थन केल्यानंतर चीनने नेपाळसंदर्भात आपली नाराजी जाहीर आहे. युएनएससीमध्ये भारताच्या स्थायी सदस्यात्वाला समर्थन देण्याचे वृत्त झळकले त्याच दिवशी संध्याकाळी चीनच्या राजदुतांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेऊन नाराजीही व्यक्त केली आहे.

दरम्यान नेपाळचे परराष्ट्र मंत्री प्रदीप ग्यावली हे गुरूवारी भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्यानंतर ग्यावली यांनी शुक्रवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेटही घेतली. या भेटीदरम्यान भारत आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा पार पडली.

यावेळी ग्यावली यांना चीनकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही देशांतर्गत राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप स्वीकारणार नाही. आम्ही आमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्षम आहोत. शेजारी देश असल्यामुळे काही चिंता किंवा प्रश्न असू शकतात. परंतु आम्हाला कोणाचाही हस्तक्षेप मंजुर नसल्याचे ग्यावली म्हणाले. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सक्षम असून त्यावर विचारही सुरू असल्याचे ते म्हणाले. भारत आणि चीन या दोन्ही देशांसोबत आपले संबंध चांगले आहेत. दोन्ही देशांसोबत असलेल्या संबंधांची आपण तुलना करणार नाही, असे ते म्हणाले.