न्या. शरद बोबडेनंतर एन.व्ही रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे येत्या २३ एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. न्या. बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश असून आता ४८ वे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण अशी चर्चा होती. तर नूतन सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्राकडे केली आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल पुढील महिन्यात संपणार असून त्यामुळे केंद्र सरकारने नूतन सरन्यायाधीश नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली होती. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नूतन नाव सूचवण्याची सूचना न्या. बोबडे याना करण्यात आली होती. तर यासंदर्भात पत्र केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शुक्रवारी सरन्यायाधीश बोबडे यांना पाठवलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशपदी सर्वात अधिक अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नेमणूक केली जाते. सध्या न्या. बोबडे यांच्यानंतर एन.व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती असून, आहेत. न्या. बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून एन.व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केंद्राकडे केली आहे.

दरम्यान, एन.व्ही. रमण यांचं वय ६४ वर्ष आहे. रमण यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला आहे. पोन्नावरम हे गाव कृष्णा जिल्ह्यात येते. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ सालापासून आपल्या वकिलीला सुरूवात केली. न्यायमूर्ती रमण यांचं B.Sc., B.L. शिक्षण झालेलं असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये रमण यांनी स्पेशलायझेशन ही केलेलं आहे.